नमस्कार,
माझ्या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आभार! माझ्या कामाचा लेखाजोखा विविध ठिकाणी प्रसिध्द झाला आहेच तरी नव्या पिढीला भावणार्या ’महाजालावर’ हि माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे हा ह्या संकेत स्थळाचा मुख्य उद्देश आहे.
माझ्या आयुष्यभराच्या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखीते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती,फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वातून माझ्या कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला याचे मला फार समाधान आहे.
माझे शरीर जरी आता थकले असले तरी नव्या पिढीबरोबर केलेल्या संवादातून माझ्या इच्छा, कल्पना पुढे नेण्यासाठी माझ्या मनाला नक्कीच उभारी मिळाले.
ह्याच बरोबरीने माझी हकिकत, ’वाशिष्ठीच्या किनार्यावरून’ हि लिहावी असे मनात आहे. काम मोठे, कष्टाचे आणि खर्चाचेहि आहे. तुमचे मत आणि मदत मिळाली तरप्रयत्न करणार आहे. ह्या संकेत स्थळावर दिलेल्या इमेलवर किंवा फोनवर किंवा चक्क पत्र लिहून तुमचा अभिप्राय नक्की कळवा. ’कशाला करता हा नवा उपद्व्याप’ असे कळवलेत तरी आनंद आहे!