माझी कर्मभूमी

तस पाहिलं तर ’सब भूमी मेरी कर्मभूमी’ असं मला म्हणता येईल. संस्कृत भाषेतील ’अपरान्त’ ह्या शब्दाचा अर्थ पश्चिम टोकाला असलेला भू-प्रदेश! ’अपरान्त’ हे प्राचीन कोकणचे नाव आहे. सुरतेपासून कारवार पर्यंत पसरलेल्या अणि लाखो वर्षांपूर्वीच्या प्रलयंकारी भूकंपात समुद्रातून वर आलेल्या या भूमीचे पुनर्वसन आणि समृध्दी भगवान परशूरामांनी  घडवून आणली. म्हणून ही परशूराम भूमी! तर अशा ह्या कोकणाला ही प्राचीन इतिहास आहे. मला त्याचे फार औत्सुक्य! गेली ४०-५० वर्षे त्याचा शोध घेण्याचा माझ्या अल्प कुवतीप्रमाणे प्रयत्न केला.

माझ्या आयुष्यभराच्या या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखीते, सनदा, फर्माने, खलिते,मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वातून माझ्या कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला याचे मला फार समाधान आहे.

माझे समाजोपयोगी छंद

सागरपुत्र विद्या विकास संस्था, दाभोळ वि. का. स. सोसायटी, महिला औद्योगिक सोसायटी, मुला-मुलींच्या वसतीगृह प्रवेशासंबंधीच्या कामांच्या बरोबरीनेच मी आणखी हि काहि छंद जोडून घेतले आहेत.

  • इतिहासाविषयी भाषण आणि संग्रहालय शास्त्राचा प्रचार
  • वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रामीण भागातील शाळांना पुस्तके मिळवून देणे
  • वृत्तपत्रातून विशिष्ट विषयाची कात्रणे काढून ती वाचनात फारसा रस नसलेल्यांना पाठवणे
  • गरजू व्यक्तींना कपडे वाटप
  • मूळ गाव कोकणात असणार्‍या प्रतिथयश लोकांचा वृत्तपत्रातून परिचय देणे आणि गौरव सत्कार करणे

थोडे बालपणाविषयी…

माझा जन्म ५ सप्टेंबर १९३० रोजी विसापूर, ता. गुहागर येथे झाला. माझे रितसर शालेय शिक्षण जरी फार झाले नसले तरी माझ्या आईमुळे माझा समजाकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल आणि उदार झाला. १९४२ चे स्वातंत्र्य समराचे यद्न्यकुंड, १९७७ ची आणिबाणी त्यानंतरचा राजकारणातील सहभाग अशा गोष्टींमुळे अनेक जाणत्या लोकांचा सहवास, सहकार्‍यांची मदत आणि पत्नी नंदिनीची ५८ वर्षांची साथ ह्यातूनच मी माझ्या परिने समाजोपयोगी काहि कामे करू शकलो. गेली ४५ वर्षे मी दाभोळलाच रहातो.
Rare sketch from Anna Shirgaonkar's collection